पुढारीची अवस्था, लांडगा आला रे आला !

औरंगाबाद - लांडगा आला रे आला,ही दंतकथा खूपच लोकप्रिय आहे.एका मेंढपाळाने गावक-यांची गंमत करावी म्हणून एकदा नव्हे दोनदा लांगडा आला रे आला म्हणून जोरजोरात ओरडले आणि लोकांची फसवणूक केली, तिस-यावेळी खरच लांडगा आला आणि मेंढपाळाने पुन्हा ओरडले तर थट्टा समजून कोणीच धावून आले नाही.मेंढपाळाच्या या दंतकथेशी मिळती - जुळती कथा पद्मश्रीच्या पुढारीची औरंगाबादेत झाली आहे.
गेल्या आठ वर्षापासून पुढारी औरंगाबादेत येणार म्हणून नुसती चर्चा आहे.दोन वेळा माणसे भरली गेली आणि काढली गेली,त्यामुळे आता पुढारी औरंगाबादेत येणार नाही,अशी समजूत औरंगाबादकरांची झाली होती.परंतु एकंदरीत हालचाली पाहता,पुढारी पुन्हा औरंगाबादेत सुरू होणार,अशी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे.संपादकीय विभाग भरतीसाठी पुढारीमध्ये २५ मार्च रोजी जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर प्रिंटींग युनिट आणि प्रशासन विभागातील भरतीसाठी दिव्य मराठीत ३० मार्च रोजी जाहिरात प्रकाशित झालेली आहे.परंतु एकंदरीत प्रतिसाद थंडच आहे.
संपादकीय विभागासाठी लायक माणसेच भेटत नाहीत.जे भेटत आहेत,ते लोकल पेपरमधील भेटत आहेत.लोकमत,सकाळ,दिव्य मराठीतून माणसे येण्यास तयार नाहीत.एक तर पुढारीमध्ये मालकशाही आहे.आले मालकाच्या मना,तिथे कोणाचे चालेना,अशी अवस्था आहे.पद्मश्री थोडे समजुतदार आहेत,त्यांना पेपरमधील ब-यापैकी तरी कळते,परंतु त्यांचे चिरंजीव कर्मचा-यांना वाटेल तसे बोलत असल्याने नाराजी आहे.स्वत:चा पेपर न वाचता,कोणाचे तरी सांगण्यावरून ते कर्मचा-यांचा अपमान करत असल्याने कर्मचारी टिकत नाहीत,त्यामुळे पुढारीमधील गळती वाढली आहे.मुंबईत रंगिला औरंगाबादीमुळे माणसे यायला तयार नाहीत.पुण्यात जोशीबुवांनी वाट लावली.त्यामुळे पुण्यात शाळगावकरांना शाळा चालवणे अवघड झाले आहे.मुंबई,पुणे आणि औरंगाबादेत मोठ्या प्रमाणात माणसे लागत असल्याने मेगा भरतीची जाहिरात निघालेली आहे.औरंगाबादेत एकदा नव्हे दोन वेळा फसलेला प्रयोग आणि नवे युनिट हेड कल्याण पांडे आणि ब्युरो चिफ अभय निकाळजे यांच्यावर असलेल्या नाराजीमुळे काही इच्छुक येण्यास तयार नाहीत.
पुढारीला औरंगाबादेत पाय रोवण्यासाठी लायक संपादक आणि टीम लीडर हवा आहे.परंतु एकही लायक चेहरा त्यांना सापडत नाही.संपादकपदासाठी उदय भविष्यपत्राच्या वरकडीला पद्मश्रींनी ऑफर दिली होती,परंतु त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला,अशी चर्चा आहे.पद्मश्रींना बहुजन चेहरा हवा आहे,परंतु त्यांना नको तोच चेहरा समोर येत आहे.पुण्यनगरीतून हकालपट्टी होणार,अशी चिन्हे दिसताच,एक पेशवाई जोडगोळी पद्मश्रीच्या संपर्कात आहे,मात्र त्यांची अजून तरी डाळ शिजलेली नाही.पद्मश्रींनी पुण्यनगरीच्या जोडगोळीला आसरा दिल्यास पुढारीची मुंबईप्रमाणे वाट लागणार आहे.
अश्या सर्व परिस्थितीत पुढारी औरंगाबादेत खरच सुरू होणार की,पुन्हा लांडगा आला रे आला,असे होणार अशी चर्चा चवीने सुरू आहे.आता पुढारी औरंंगाबादेत सुरू न झाल्यास भविष्यात कधीच सुरू होणार नाही,हे मात्र नक्की.