स्ट्रिंगर रिपोर्टरच्या समस्या कोण सोडवणार ?


सुधाकर शेट्टी यांच्या जय महाराष्ट्रने एकीकडे मेगा भरती काढली आहे तर दुसरीकडे राज्यातील स्ट्रिंगर रिपोर्टरचे पेमेंट चार महिन्यापासून थकवले आहे.त्यामुळं स्ट्रिंगर रिपोर्टरमध्ये असंतोष खदखदत आहे.स्ट्रिंगर रिपोर्टरच्या व्हॉटस एॅप
ग्रुपवर यावर बरीच चर्चा रंगली होती.
जय महाराष्ट्रचे मुंबईसह राज्यात जवळपास ६८ स्ट्रिंगर रिपोर्टर आहेत.मात्र नव्या साहेंबानी नवी समीकरणे आखाण्यास सुरूवात केलेली आहे.फक्त मेट्रो सिटीवर नव्या साहेबांचा भर आहे.त्यामुळे ही संख्या ४० वर करण्याचा विचार सुरू आहे.
काही इच्छुक रिपोर्टर वागळेंच्या येवू घातलेल्या चॅनलच्या मुलाखतीसाठी मुंबईत गेले असता,जाता-जाता त्यांनी जय महाराष्ट्रकडे चक्कर मारली व मँनेजिंग एडिटरची भेट घेतली असता त्यांना हे स्पष्ट सांगण्यात आलं की,आहे तेच कमी करण्यात येणार आहेत.त्याऐवजी तुम्ही वेबसाईट सुरू करा,असा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला.
जे या क्षेत्रात आहेत त्यांना अनुभव नसल्यामुळं संधी मिळत नाही.अरे संधी दिली तर अनुभव मिळेल ना...राज्यातील अनेक ठिकाणी एकाच घरात तीन ते चार चॅनल आहेत.त्यामुळं एकच फुटेज आलटून पालटून सर्व चॅनलला पाठवले जाते.अश्यां लोकांना नारळ दिला पाहिजे आणि नविन होतकरू मुलांना संधी दिली पाहिजे.
पत्रकारितेत एकप्रकारचे नैराश्य आले असताना वागळेंच्या चॅनलमुळं एक नवी आशा निर्माण झाली होती.परंतु वागळेंचे चॅनल स्ट्रिंगरना पैसेच देणार नसल्यामुळं एक प्रकारचा भ्रमनिरास झालेला आहे.
झी तास स्ट्रिंगरना वेळेवर पेमेंट देत असले तरी ३० हजाराच्या पुढे बिल जात असेल तर त्यांत कपात करण्याचा निर्णय घेतलाय.एबीपी माझाबद्दल स्ट्रिंगरची तक्रार नाही.आयबीएन - लोकमत आणि टीव्ही ९ मोजक्या स्टो-या लावत असल्यामुळं त्यांचं बिल १० हजाराच्या पुढे जात नाही.मी मराठीचीही तिच बोंब आहे.जेमतेम पाच ते दहा हजार रूपये हातात पडत आहेत.स्टिंगर रिपोर्टरची अवस्था धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी आहे.
तुटपुंज्या मानधनामुळं अनेक स्ट्रिगर रिपोर्टर आर्थिक अडचणीत आहेत.जे लुच्चे आणि लफंगे आहेत,त्यांना मानधनाचे काही वाटत नाही.परंतु जे प्रामाणिकपणे काम करतात,त्यांचे अवघड आहे.मुंबईतील एका स्ट्रिंगर रिपोर्टरने आर्थिक अडचणीमुळंच काही दिवसांपुर्वी आत्महत्त्या केली होती.असे प्रकार थांबवण्याठी स्ट्रिंगर रिपोर्टरना आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे.