आशिष जाधव यांचे बेरक्यास पत्र

प्रिय बेरक्याराव,
मी काही आपल्याला माझं राजीनामापत्र पोस्ट करा, अशी विनंती केली नव्हती. पण तरीही तुम्ही ते पत्र पोस्ट केलं, असो. त्याला माझी कसलीही हरकत असण्याचं कारण नाही. राहिला प्रश्न या हुंडगेगिरीचा.... मला उद्देशून जी पोस्ट आपण प्रकाशित केली, त्याला उत्तर देण्याची खरं तर गरज नाही. पण जे मला प्रत्यक्ष ओळखतात, त्यांचा गैरसमज होऊ नये. तसंच हा विषय विनाकारण हाताबाहेर जाऊ नये, यासाठी हे छोटेखानी उत्तर देतोय.... उत्तर अगदी साधेसरळ आहे. हे सर्व बकवास आहे.... कोणाची किती लायकी आहे, हे सर्व जगाला माहीत आहे. पत्रकारितेत दुसऱ्याचे खच्चिकरण करून कोणीही मोठं होत नाही, त्यातही टीव्ही मिडियात तर नाहीच नाही. जे अस्सल आहे, जे खणखणित आहे, ते नाणं कुठेही वाजतंच. पण जे बनचुके किंवा नकली असतात, ते मात्र हुजरेगिरी करणाऱ्यांना हाताशी धरून स्वत:चे दिवस ढकलत असतात. त्यामुळं माझ्यासारख्या फाटक्या तोंडाच्या माणसानं तोंड उघडलं तर मोठा हंगामा होऊ शकतो. म्हणूनंच झाकली मूठ सव्वालाखाची असते, असं मानत असतो. माझ्यासाठी हा विषय इथेच संपला हे जाहीर करतो.
आपला...
आशिष जाधव
.........................................................................

बेरक्याचे उत्तर 
.
प्रिय आशिषराव,
तुमचे पत्र आम्ही जसेच्या तसे प्रकाशित केले आहे.मीडियात ज्या घडामोडी सुरू आहेत,त्या प्रकाशित करण्याचे बेरक्या एक ऐकमेव व्यासपीठ आहे.हे व्यासपीठ गेल्या साडेचार वर्षापासून अखंडीत सुरू आहे.
बेरक्याने आजपर्यंत कोणाचाही मुलाहिजा ठेवलेला नाही.चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याचे काम बेरक्याने केले.जे चांगले आहेत,त्यांच्या मागे बेरक्या ठामपणे उभारला.गरीब पत्रकारांना मदतीचा हात दिला.अनेकांना जॉब मिळवून दिला. त्याचबरोबर कोणाचीही नाहक बदनामी होवू नये,याची काळजी घेतली.
ज्यांच्याविरोधात बातमी आली त्यांना वाईट वाटणे सहाजिक आहे.परंतु हे व्यासपीठ सुरू करण्यामागे आमचा कसलाही स्वार्थ नाही.बेरक्याबाबत आपला काही दुराग्रह असल्यास दूर करावा...
आपला,
बेरक्या उर्फ नारद