सरकारी "दूरदर्शन'चा चेहरा बदलणार

नवी दिल्ली - देशातील सर्वांत मोठी वृत्तवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूरदर्शनचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार सरकारने केला आहे. देशाचे स्वत:चे चॅनेल म्हणून दूरदर्शनचे प्रमोशन केले जाणार आहे. ताज्या मजकुराबरोबरच मनोरंजनाचा खजिना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांसमोर सादर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. "देश का अपना चॅनेल‘ या नव्या पंचलाईनसह सोमवारपासून या वाहिनीचे प्रमोशन केले जाणार आहे.

कार्यक्रमांचे स्वरूप बदलण्याबरोबरच रंगसंहितेमध्येही आकर्षक फेरबदल घडवून आणण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या डोळ्यांना अधिक सुखद अनुभव येईल. खासगी वृत्तवाहिन्यांना टक्‍कर देण्यासाठीच दूरदर्शनचे स्वरूप बदलण्यात आल्याचे बोलले जाते. दूरदर्शनला लोकांची वाहिनी बनविण्यासाठी जाणीवपूर्वक बदल घडवून आणले जात आहेत. सोमवारपासून हे बदल घडविले जातील. नवा फ्रेश कंटेंट देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दूरदर्शनवरील प्राईमटाईममध्ये आठ नवे शो दाखविले जातील. सुरवातीला दर्जेदार मजकूर प्राप्त करण्यात अनेक अडचणी होत्या; पण आता तो प्रश्‍न मिटला आहे. नव्याने जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे स्पर्धात्मक वातावरणाला पोषक ठरणारी आहेत. सर्वोत्कृष्ट सेवा देण्याची क्षमता दूरदर्शनकडे आहे असे आम्हाला वाटते. कौटुंबिक मूल्ये, विश्‍वासार्हता, राष्ट्रउभारणीस दूरदर्शन प्राधान्य देईल, असेही सांगण्यात आले.
लोकांना निखळ मनोरंजन देण्याच्या हेतूनेच आम्ही हे बदल घडवून आणले आहेत. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत आम्ही हा मनोरंजनाचा नजराणा लोकांसमोर सादर करणार आहोत. लोकांचा याला भरपूर प्रतिसाद मिळेल, याची आम्हास पूर्ण खात्री आहे.
विजयालक्ष्मी छाब्रा, दूरदर्शनच्या महासंचालक