बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

मंगळवार, २४ मे, २०१६

दै.भास्करचा वार्ताहर लाच घेताना अटक

उस्मानाबाद - उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अर्थसहाय्य तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांना सांगून मंजूर करून देण्यासाठी म्हणून ५०० रूपयांची लाच स्विकारणारा दैनिक सुराज्य आणि दैनिक भास्करचा पत्रकार विष्णू वसंत उघडे (रा. .वाशी) याला एसीबीने जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी दुपारी वाशी येथे करण्यात आली असून,या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका महिला संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुदान मिळविण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह वाशी तहसील कार्यालयाकडे अर्ज करण्यासाठी गेली होती. तेथे विष्णू उघडे याची त्या महिलेशी भेट झाली. उघडे याने त्या महिलेचा प्रस्ताव दाखल करून संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान व त्यासाठी आवश्यक असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र अधिकारी, कर्मचार्‍यांना सांगून मिळवून देतो असे सांगितले. तसेच या कामासाठी त्या महिलेकडून २२०० रूपये घेतले. काही दिवसांनी विष्णू उघडे याने तक्रारदार महिलेला १७०० रूपयांची मागणी करून ती देण्यासाठी तगादा लावला. त्यानंतर त्या महिलेने उस्मानाबादेतील एसीबीच्या कार्यालयात तक्रार केली.
महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर उपाधीक्षक अश्‍विनी भोसले यांनी पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी वाशी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. त्यावेळी विष्णू उघडे याने तक्रारदार महिलेकडे तिच्या कामासाठी पैशांची मागणी करून ५०० रूपये स्विकारल्यानंतर कारवाईकरण्यात आली. याबाबत वाशी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास पोनि आसिफ शेख हे करीत आहेत.


दैनिक सुराज्य (बीड) आणि दैनिक भास्कर (औरंगाबाद) वृत्तपत्राचा वाशी (जि.उस्मानाबाद) येथील वार्ताहर विष्णु उघडे यास पाचशे रूपयाची लाच घेताना अॅन्टी करेप्शन ब्युरोच्या पोलीसांनी रंगेहात पकडून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे..
या वार्ताहरावर कुणाचा वरदहस्त होता,याचा तपास संबंधित वृत्तपत्राचे संपादक करतील का ?


वाचा सविस्तर प्रेसनोट 

शनिवार, २१ मे, २०१६

जालना सहल प्रकरणातील पत्रकाराचा राजीनामा घेतला !

भाजप प्रदेशाध्यक्षाने प्रायोजित केलेल्या जालना येथील ५ पत्रकारांच्या विमान सहलीचा बेरक्याने पर्दाफाश केल्यानंतर या सर्व पत्रकारांच्या दैनिकाच्या व्यवस्थापनाने चौकशा सुरू केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी माफीनाम्यावर दिलासा मिळालेल्या सर्वाधिक खपाच्या दैनिकाचे जालना येथील पत्रकार संजय देशमुख यांचा आज एच आर विभागाने औरंगाबादला बोलावून राजीनामा घेतला आहे. तर 'मानबिंदु'ने सहलीला गेलेल्या पत्रकाराच्या अधिकारात मोठी कपात केली आहे. त्याच्यावर 'लक्ष' ठेवण्यासाठी औरंगाबाद येथून सोमनाथ खताळ यांना पाठवण्यात आले आहे. त्यांनी जालना कार्यालयात काम सुरू केली असून त्यांच्या २ बायलाईन बातम्याही आल्या आहेत.
औरंगाबादच्या 'पुण्य'च्या मोठया सेठजीनी अद्याप सहल प्रकरणात लक्ष घातलेले नाही. सहलीहून येवून पुन्हा गायब झालेला त्यांचा पत्रकार कधी रुजू होतोय, याची सेठजी वाट पाहत आहेत. विमान सहलीदरम्यान कार्यालयात गैरहजर असतानादेखील 'पुण्य'च्या जिल्हा प्रतिनिधीने हजेरी पुस्तकावर सह्या केल्याचे समजते. त्यामुळे मोठे सेठजी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भोपाळसेठच्या 'भव्य मराठी' च्या जालन्याच्या प्रतिनिधीवर औरंगाबादच्या ब्यूरो चीफ मुळ हुद्दा असलेल्या सॅटेलाईट एडिटरचा वरदहस्त असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे. 'सॅटेलाईट' ला 'राज्य'चा आशीर्वाद आहे.
'मानबिंदू'ने भोकरदनला नवीन वार्ताहाराचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे सहलीला गेलेल्या भोकरदन वार्ताहाराची हकालपट्टी नक्की मानल्या जाते.

बेरक्याचे निवेदन

हल्ली बेरक्यावर कधी तरीच अपडेट असते,बेरक्या पुर्वीप्रमाणे आक्रमक नाही,बेरक्या थंड झाला,अशी चर्चा काहीजण करत आहेत.चर्चा करणा-यांच्या तोंडावर आम्ही हात धरू शकत नाही.ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
परंतु आम्ही सांगू इच्छितो की,बेरक्याला माहिती मिळताच,त्याची एकदा नव्हे चारदा खात्री केली जाते,क्रॉस चेक झाल्यानंतर बातमी खरी असेल तर बेरक्यावर प्रकाशित केली जाते.त्यामुळे बेरक्यावर कमी प्रमाणात पण शंभर टक्के ख-या असणा-या बातम्या प्रकाशित केल्या जात आहेत.
बेरक्या ब्लॉग सुरू होवून साडेपाच वर्षे झाली.बेरक्यावर आलेली बातमी शंभर टक्के खरी असते,असा पत्रकारांचा आणि लोकांचा  विश्वास आहे,बेरक्या ब्लॉग फक्त पत्रकारच वाचत नाही तर सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी,पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर महाराष्ट्रात तमाम जनता वाचते.मराठी मीडियात बेरक्याने इतिहास घडवला आहे.सर्वाधिक वाचणारा आणि लाखो हिटस् मिळवणारा बेरक्या हा ऐकमेव ब्लॉग आहे.त्यामुळे कोणाच्याही  विश्वासाला तडा जावू द्यायचा नाही.बेरक्याची लोकप्रियता अफाट आहे.त्याने मराठी मीडियाचे एव्हरेस्ट सर केले आहे.त्यामुळे या लोकप्रियतेला गालबोट लागू नये,याची काळजी घेतली जात आहे.यश मिळवणे जेवढे अवघड आहे,तेवढे यश पचवणे अवघड आहे.
यश मिळाले म्हणून कश्याही बातम्या देणे आणि त्या खपवणे हे बेरक्याच्या रक्तात नाही.भले एक बातमी देता आली नाही तरी चालेल परंतु चुकीच्या बातमीमुळे कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर ती बातमी टाळणे योग्य आहे.बेरक्या कोणाच्याही विरूध्द ऊठसुठ बातम्या देत नाही.ज्या बातम्या ख-या असतील किंवा माहिती खरी असेल तरच बातम्या प्रकाशित केल्या जातात.
बेरक्या म्हणजे मराठी मीडियातील पीटीआय किंवा गॅझेट झाला आहे.त्यामुळे बेरक्यावर येणा-या बातम्या या तंतोतंत ख-या असतील.कोणाची दुश्मनी काढण्यासाठी बेरक्या ब्लॉगचा आता वापर होणार नाही.त्यामुळे कोणाला काय चर्चा करायची ती करू द्या,परंतु बेरक्यावर येणारी बातमी सत्यच असेल.
बेरक्याला माहिती देण्यासाठी सोबत पुरावे जोडावे.कोणाच्याही विरूध्द खोट्या बातम्या पाठवू नये,इतकेच यानिमित्त सांगणे.

आपला
बेरक्या उर्फ नारद

प्रवीण बर्दापूरकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार

 झुंझार पत्रकार , साहित्य सम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मरणार्थ आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या यंदाच्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांची निवड करण्यात आली आहे . आचार्य अत्रे यांच्या पुण्यतिथी दिनी, येत्या १३ जूनला सासवड येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात प्रवीण बर्दापूरकर यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे .
     आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विंजय कोलते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली . कुमार केतकर , प्रकाश पोहोरे , किरण ठाकूर, राजीव खांडेकर , सुधीर भोंगळे , दीपक टिळक , संजय राऊत प्रभृती मान्यवर हे याधीचे, या पुरस्काराचे मानकरी आहेत . 
     गेली सुमारे पावणेचार दशके पत्रकारितेत असणाऱ्या प्रवीण बर्दापूरकर यांनी २६ वर्ष विदर्भात पत्रकारिता केली आहे . ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृतीचे संपादकपद त्यांनी भूषविले आहे तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाचे राजकीय संपादक म्हणून त्यांनी दिल्ली येथे काम केलेले आहे . नागपूर , मुंबई , दिल्ली , औरंगाबाद येथे एक वार्ताहर म्हणून काम केलेले बर्दापूरकर , महाराष्ट्राच्या राजकीय सांस्कृतिक घड्मोडींचे भाष्यकार म्हणून परिचित आहेत . वृत्त्संकनाच्या निमिताने ४०वर देशांना भेटी दिलेले प्रवीण बर्दापूरकर हे  साल्सबर्ग सेमिनारची अभ्यासवृती मिळवणारे एकमेव मराठी पत्रकार आहेत . पत्रकारिता आणि विविध साहित्यविषयक १२ पुस्तके बर्दापूरकर यांच्या नावावर आहेत . सध्या ते ब्लॉगर आणि मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत .

मंगळवार, १७ मे, २०१६

जालना सहल प्रकरण : बेरक्याच्या बातमीची वरिष्ठाकडून दखल

जालना - भाजप प्रदेशाध्यक्षानी प्रायोजित केलेल्या मर्जीतल्या 5 पत्रकारांच्या सहपरिवार विमान सहलीची बातमी 'बेरक्या'ने प्रसिद्ध करताच, 'त्या' दैनिकाचे व्यवस्थापन खडबडुन जागे झाले आहे. या बातमीची जालना शहर व जिल्ह्यात जोरदार चर्चा असून, 'बेरक्या'ची बातमी whatsaap व facebook वरून दोन दिवसापासून फिरत असून ही पोस्ट व्हायलर झाली आहे.
'बेरक्या' च्या बातमीची दखल घेऊन काल रविवारीच महाराष्ट्रातल्या सर्वाधिक खपाच्या दैनिकाच्या औरंगाबाद येथील संपादकांनी जालना येथील विमानाने सहल केलेल्या बातमीदारास काम थांबविण्याचे आदेश दिले होते. आज सकाळीच 11 वाजता औरंगाबादला जावून या बातमीदाराने संपादकांसमोर हजेरी लावली. पहिले दोन तास तर संपादकांनी त्याला भेट दिली नाही. खूप गयावया केल्यानंतर संपादक त्याला भेटले. यावेळी संपादकांनी त्याची चांगलीच झाडाझडती घेत तासभर खरडपट्टी काढली. यावेळी त्याने रजेचे खोटे कारण सांगून सहलीला गेल्याची कबुली दिली असून, आपण स्व:खर्चाने सहल केल्याचे सांगितले. मात्र संपादकांना त्याचा खोटारडापणा लक्षात आल्याने ते काम थांबविण्याच्या भूमिकेवर ठाम होते. या प्रकरणी सदर बातमीदारावर कडक कारवाई  होण्याची चिन्हे आहेत
 * 'मानबिंदू'ने आपल्या जिल्हा-प्रतिनिधी आणि तालुका वार्ताहाराची अध्याप चौकशी सुरू केल्याचे समजले नाही. 'मानबिंदू'चा जिल्हा प्रतिनिधी तर काल एका पत्र परिषदेत 'मी नाही त्यातली..' असा आव आणून वागत होता. मी मुंबईत पद्मश्रीच्या पेपरमध्ये असताना खूप कमाई केली आहे, माझे मुंबईत 2 फ्लॅट आहेत, मला नोकरीची गरज नाही, असे काही पत्रकारांजवळ बोलत असल्याचे समजते.
* भोपाळशेठच्या 'भव्य मराठी'चा पत्रकार आज दिवसभर कार्यालयात ठाण मांडून होता. तोही बायको पोलीस खात्यात नोकरीला असल्याने 'भव्य'च्या नोकरीची गरज नसल्याच्या तोर्यात वागत आहे. तर 'पुण्य'चा जिल्हाप्रतिनिधी काल रुजू होणार होता मात्र बेरक्यावर बातमी झळकताच आणखी काही दिवसाची रजा वाढवून गायब झाला आहे.
*मानबिंदू, भव्यमराठी व पुण्यच्या या पत्रकारांवर काय कारवाई होते, याकडे जालन्याच्या मीडियाचे लक्ष लागले आहे. बेरक्याने या पत्रकारांचा पर्दाफाश केल्याने त्यांच्या हूकूमशाहीला कंटाळून गेलेले कनिष्ट सहकारी कर्मचारी मात्र खूष असून त्यांच्यापासून कधी कायमची सुटका होईल, याची वाट पाहत आहेत.

रविवार, १५ मे, २०१६

‘मी मराठी’ पेपर अखेर बंद

मुंबई - 13 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांकडून तब्बल 39 हजार कोटी रुपयांची माया बेकायदेशीरपणे गोळा करणारा महेश मोतेवार आज ओडिशा येथील तुरूंगात सडत आहे. त्यांनी गुंतवणूकदारांच्या पैशातून उभारलेला ‘मी मराठी लाईव्ह’ हा पेपर अखेर 13 मे रोजी बंद पडला.
देशभरातील 13 लाख 45 हजार 119 गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीर मार्गाने तब्बल 39 हजार कोटी रुपयांची रक्कम गोळा करणारा महेश मोतेवार (वय 46 रा. धनकवडी) सध्या तुरूंगात आहे.
रिक्षावाले, रस्त्यावर भाजी विकणारे विक्रेते यांसारख्या सामान्य माणसांना मोठ्या लाभाचे आमिष दाखवून मोतेवार व त्यांच्या समृध्द जीवनने अक्षरशः लूट केली. यातून मिळालेली काळी माया त्यांनी मी मराठी लाईव्ह या वृत्तपत्रात गुंतविली. या वृत्तपत्राच्या माध्यमातून स्वतःची काळी कृत्ये पडद्यावर येऊ नयेत व समृध्द जीवनद्वारे आखलेल्या खोट्या आमिषांना गुंतवणूकदार बळी पडावेत हे सुप्त हेतू ठेवले. या वृत्तपत्राच्या संचालक पदांवर त्यांनी कुमार केतकर, निखिल वागळे, शिवसेनेचे माजी खासदार भारतकुमार राऊत यांना कामाला ठेवले. या सर्व कुख्यात पत्रकारांनी 420 मोतेवार व त्यांच्या कंपनीच्या भरभराटीसाठी सहाय्य केले. यामुळे त्यांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेने केली होती.
मोेतेवार यांना 31 मार्च रोजी अटक झाली व अवघ्या 2 महिन्यानंतर म्हणजे 13 मे रोजी ‘मी मराठी लाईव्ह’ हे वृत्तपत्र बंद पडले. मोतेवार व त्यांच्या या चांडाळ चौकडीने सामान्यांच्या लुटीतून मिळालेल्या काही कोटी रूपयांच्या रकमेतून ‘मी मराठी’ व ‘लाईव्ह इंडिया’ हे चॅनल्स विकत घेतले. हे चॅनल्सही कोणत्याही क्षणी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मोतेवार यांच्या समृध्द जीवनचे हजारो एजण्टस आज प्रचंड मानसिक टेन्शनमध्ये आहेत. बहुतेकांनी त्यांचे नातेवाईक, हितचिंतक यांच्याकडून पैसे गोळा करून ते समृध्द जीवनमध्ये गुंतवले होते. आज याच एजण्टसच्या मागे सर्व गुंतवणूकदार पैशाचा तगादा लावत आहेत. मोतेवारांच्या पत्नी वैशाली मोतेवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला असून त्या सध्या फरार आहेत.
मी मराठीच्या शेकडो कामगारांचे पगार या कंपनीने अद्याप दिलेले नाहीत. कुमार केतकर, भारतकुमार राऊत यासारख्या कुख्यात पत्रकारांनी मोतेवारांची लाचारी करून कोट्यवधी रूपये कमवले. या सर्वांची 'इडी'मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर ‘एमपीआयडी’ अ‍ॅक्ट लावून त्यांना तुरूंगात खडी फोडायला पाठविण्यात यावे अशी मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेने केली आहे.
मी मराठी बंद पडल्यामुळे केतकर, राऊत यांसारख्या कुख्यात पत्रकारांचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही, त्यांनी आधीपासूनच ‘नव्या मोतेवारांचा’ शोध घेण्यास सुरूवात केली आहे. ज्या स्ट्रींजर्स, सब एडिटर्स, ऑपरेटर्सच्या बळावर मी मराठीने गरूड झेप घेतली, ते सर्वसामान्य कर्मचारी आज हवालदिल झाले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

जामीन अर्ज फेटाळला
* महेश किसन मोतेवार यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस.जे.काळे यांनी 6 मे रोजी फेटाळून लावला.मोतेवार यांना 31 मार्चला अटक झाली आहे. या गुन्ह्यात मोतेवार यांनी जामीन मिळावा, अशी मागणी कोर्टाकडे केली होती. अतिरिक्त सरकारी वकील सुनिल हांडे यांनी जामीनास विरोध केला. ते म्हणाले आरोपीने गुंतवणूकीच्या बेकायदा योजना तयार केल्याची माहिती आयकर विभागाच्या अहवालात नमूद केली आहे. आरोपीच्या कंपनीचे देशभरात सुमारे 13 लाख 45 हजार 119 एवढे गुंतवणूकदार आहे त्यांना कंपनीकडून सुमारे 135 कोटी रूपये परतावा देणे बाकी आहे.
* आरोपीच्या धनकवडी येथील घरात बायोमेट्रिक पध्दतीचे कपाट असून ते आरोपीची पत्नी लिना मोतेवार याच उघडू शकतात. या कपाटामध्ये महत्वाची कागदपत्रे असू शकतात. गुंतवणूकदारांकडून मिळालेले पैसे आरोपीने वेगवेगळ्या प्रकल्पात गुंतविले आहेत. स्थावर मिळकती, जंगल मालमत्ता त्यांनी खरेदी केलेल्या तपासात आढळून आले आहे. या कंपनीने कर बुडविला आहे. देशभरात आरोपींविरूध्द 12 गुन्हे दाखल आहेत. सध्या तो ओडिशा येथील गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या ताब्यात आहे. या गुन्ह्याचा तपास अद्याप पूर्ण झाला नाही.

समृद्ध जीवनने लाटला हजारो कामगारांचा 'पीएफ'
* भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भविष्यनिर्वाह कार्यालयात जमा न करता अपहार केल्याप्रकरणी समृद्ध जीवन चिटफंड कंपनीचा संचालक महेश मोतेवार याच्यासह दोघांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी 15 मे रोजी गुन्हा दाखल केला. भविष्यनिर्वाह निधी कार्यालयातील निरीक्षक सुरेश फाळके यांनी या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
* फिर्यादीनुसार महेश मोतेवार आणि राजेंद्र पांडुरंग भंडारे (रा.दमानीनगर,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्मचार्‍यांच्या वेतनातून भविष्यनिर्वाह निधीचे बारा लाख 34 हजार रुपये कापून घेण्यात आले. ही रक्कम त्यांनी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात भरली नाही. त्यामुळे निरीक्षक फाळके यांनी तक्रार नोंदविली.
* सीबीआयने आतापर्यंत महाराष्ट्र व ओडिशा या राज्यांतील 'समृध्द जीवन'च्या तब्बल 70 शाखांना सील केले आहे.
* ‘इडी’च्या अडथळ्यामुळे महेश मोतेवार यांना संपत्ती विकण्यास अडथळा निर्माण होत आहे.
* सीबीआयच्या मते 'समृध्द जीवन'चा घोटाळा हा 39 हजार कोटींचा आहे.
........
सौजन्य
उन्मेश गुजराथी

स.सो.खंडाळकर लोकमतमधून निवृत्त होणार


औरंगाबाद - दैनिक लोकमतचे विशेष प्रतिनिधी,ज्येष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर हे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर येत्या १ जूनपासून लोेकमतमधून सेवानिवृत्त होत आहेत.औरंगाबादमध्ये दैनिक लोकमत १९८२ ला सुरू झाला.तेव्हापासून आजपर्यंत खंडाळकर दैनिक लोेकमतमध्ये कार्यरत होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील अचलेर गावचे स.सो.उर्फ सदाशिव सोपानराव खंडाळकर यांच्या पत्रकारितेची सुरूवात सन १९८० मध्ये दैनिक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत झाली.याचवेळी त्यांनी एका दलित कन्येशी आंतरजातीय विवाह करून समाजापुढे आदर्श घालून दिला.दैनिक लोकमत औरंगाबादेत सुरू झाल्यानंतर ते औरंगाबादेत आले.सुरूवातीस शहर वार्ताहर नंतर चिफ रिपोर्टर म्हणून त्यांनी काम केले.सोलापुरात दैनिक लोकमत सुरू झाल्यानंतर त्यांनी काही काळ सोलापुरात काम केले.सोलापुरात असताना रॉकेल विक्री घोटाळा काढून सोलापुरात रॉकेलला लागली आग,ही मालिका त्यांनी गाजवली.तसेच औरंगाबादेत स्व.जवाहरलाल दर्डा अन्न आणि पुरवठा मंत्री असतानाही पुरवठा खात्यातील मोठा घोटाळा काढला होता.त्यांच्या अनेक शोधवार्ता गाजल्या आहेत.त्यांना ५० हून अधिक विविध पुरस्कार मिळाले आहेत.
राजेंद्र दर्डा यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या खंडाळकर यांच्यावर पाच वर्षापुर्वी हृदय धमनी बाईपास सर्जरी होवूनही त्यांनी सेवानिवृत्ती न घेता दैनिक लोकमतशी असलेली नाळ तोडली नाही.लोकमतच्या पडत्या काळात चौकाचौकात पेपर वाटण्याचे कामही खंडाळकर यांनी केले.लोकमतमध्ये अनेक आले आणि गेले परंतु खंडाळकर यांनी  कधीही लोकमत सोडले नाही.प्रतिस्पर्धी दैनिकाची मोठी ऑफर आली असतानाही त्यांनी लोकमतशी गद्दारी केली नाही.लोकमत आणि खंडाळकर असे जणू समिकरण झाले होते.
एक अभ्यासू,व्यासंगी,शैलीदार लेखन करणारा आणि सर्वांशी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारा पत्रकार म्हणून स.सो.खंडाळकर यांची ख्याती आहे.
औरंगाबादेत काही दिवसापुर्वी मित्रपरिवारांने त्यांचा मोठा जंगी सत्कार केला होता.यावेळी गौरव अंक काढून त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.ते दैनिक लोकमतमधून सेवानिवृत्त होत असताना,लोकमत मोठा जंगी सत्कार करणार का,याकडे लक्ष वेधले आहे.

औरंगाबादेत झालेल्या जंगी सत्काराची व्हिडीओ क्लीप
जाता -  जाता :
स.सो.खंडाळकर हे लोकमत मधून सेवानिवृत्त होत आहेत तर गणेश खेडकर आणि सुहास अंजनकर यांनी लोकमतचा राजीनामा दिलेला आहे.खेडकर हे दिव्य मराठीत एन्ट्री करणार आहेत तर अंजनकर हे स्वत:चा व्यवसाय सुरू करणार आहेत.
लोकमतमध्ये रिक्त झालेल्या तीन जागांवर विजय देऊळगावकर (म.टा.),मंदार जोशी, (दिव्य मराठी) मनोज साखरे ( सकाळ ) यांची लोकमतमध्ये वर्णी लागली आहे.हे तिघेही १ जूनपासून लोकमतमध्ये ज्वाईन होणार आहेत.

फेसबुक वर शेअर करा

Facebook